---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सावखेडा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्तरीत्या छापेमारी करत पोकलँड मशीन, डंपर, बोटी आणि डिझेलचा साठा जप्त केला.
युवा कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तापी नदी पात्रात पोकलँड मशीन आणि बोटींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू होता. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार आज संयुक्त पथकाने सावखेडा परिसरात धाड टाकली.
सदर कारवाईदरम्यान रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे डंपर, पोकलँड मशीन, बोटी तसेच अवैधरित्या साठवून ठेवलेल्या डिझेल टाक्यांमधील इंधन जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे रेतीमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली.
घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून अवैध रेती वाहतूक आणि बेकायदेशीर डिझेल साठा प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.









