---Advertisement---
उदयपूर:
राजस्थानची ‘लेक सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या १३ वर्षांच्या मुलीला पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा पाय घसरून ३० फूट खोल ऐतिहासिक कुंडात बुडून मृत्यू झाला आहे. वडिलांना डोळ्यांदेखत पाण्यात बुडताना पाहून लहान मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.
उदयपूरच्या ठोकर चौराहा येथील रहिवासी असलेले दुर्गाशंकर हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या १३ वर्षांच्या मुलीला आणि लहान मुलाला पोहायला शिकवण्यासाठी शहरातील ऐतिहासिक आणि प्राचीन ‘गंगू कुंड’ येथे घेऊन आले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी कुंडाच्या पायऱ्यांवरच उभी होती आणि दुर्गाशंकर तिला पाण्यात उतरण्याच्या सूचना देत होते.
याच दरम्यान अचानक दुर्गाशंकर यांचा पाय पायरीवरून घसरला. गंगू कुंड सुमारे ३० फूट खोल असल्याने, पाय घसरताच ते थेट खोल पाण्यात गेले. पोहता येत नसल्याने ते स्वतःला वाचवण्यासाठी पाण्यात हातपाय मारू लागले आणि पाहता पाहता खोल पाण्यात बुडाले.
”पप्पा बाहेर या… जिवंत व्हा…” मुलांचा टाहो
वडिलांना डोळ्यांदेखत पाण्यात बुडताना पाहून कुंडाच्या बाहेर उभी असलेली दोन्ही निष्पाप मुलं प्रचंड घाबरली. ती जोराजोराने रडू लागली आणि ओरडू लागली, “पप्पा बाहेर या… जिवंत व्हा…” मुलांचा हा हृदयद्रावक आक्रोश ऐकून आजूबाजूचे लोक धावत घटनास्थळी गोळा झाले.
लोकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
दुर्घटना घडली त्या वेळी तिथे इतरही काही लोक उपस्थित होते. मात्र, दुर्दैवाने कोणीही पाण्यात उडी मारून दुर्गाशंकर यांना वाचवण्याचे धाडस किंवा प्रयत्न केला नाही, असा दावा केला जात आहे. यानंतर नागरिकांनी तात्काळ भूपालपुरा पोलीस ठाणे आणि सिव्हिल डिफेन्स (नागरी संरक्षण) टीमला याची माहिती दिली.
अवघ्या १० मिनिटांत काढले बाहेर, पण…
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सिव्हिल डिफेन्सचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सिव्हिल डिफेन्सच्या पाणबुड्यांनी वेळ न घालवता ३० फूट खोल कुंडात उडी घेतली. अवघ्या १० मिनिटांच्या अथक मोहिमेनंतर दुर्गाशंकर यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
गेल्याच आठवड्यात उदयपूरच्या फतहसागर तलावात अशीच एक दुर्घटना झाली होती. त्यानंतर आता गंगू कुंडात ही दुसरी मोठी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. फत्तेहसागर, गोवर्धन सागर आणि गंगू कुंड यांसारख्या जलाशयांवर दररोज शेकडो लोक पोहण्यासाठी आणि शिकण्यासाठी येतात. मात्र, एवढी मोठी गर्दी होऊनही प्रशासनाकडून सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था केलेली नाही. सर्व प्रमुख जलाशयांवर तात्काळ ‘लाईफगार्ड’ (जीवरक्षक) तैनात करण्यात यावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुलांचा तो आक्रोश ऐकणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.









