---Advertisement---
मुंबईच्या मीरा रोड परिसरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात शंभू शर्मा नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली.
मृत मुलाची आई आणि आरोपी प्रियकर एकत्र राहत होते. घरात असताना आरोपीने मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
मात्र पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना मुलाच्या शरीरावरील जखमांच्या खुणा पाहिल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टेम अहवालात मुलाचा मृत्यू गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान आरोपीने मुलाला मारहाण केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
आरोपीने हे कृत्य नेमके कोणत्या कारणातून केले, तसेच या घटनेबाबत मुलाच्या आईला काही माहिती होती का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.









