---Advertisement---
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठत सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सलग ४,३९९ दिवसांचा विक्रम मागे टाकत नरेंद्र मोदी यांनी नव्या इतिहासाची नोंद केली आहे. या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारा विशेष ठराव मंजूर केला जाणार आहे.
भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी प्रथमच देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दुसऱ्यांदा आणि २०२४ मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन सलग नेतृत्व कायम ठेवले. याच सलग सर्वाधिक कार्यकाळामुळे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडीत काढत देशाच्या राजकीय इतिहासात आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
भारतासाठी या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने आयोजित बैठकीला एनडीए शासित विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच भाजप आणि मित्रपक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मित्रपक्षांच्या अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती या बैठकीत राहणार आहे.
बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार असून, आगामी काळातील विकासाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे. भारताच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक समन्वय कसा साधता येईल, यावरही चर्चा होणार आहे. याशिवाय नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी विविध धोरणांवर विचारमंथन होणार आहे.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना विकासकामांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नका, असे निर्देश दिले होते. सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य देण्यासोबतच भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम आपल्या नावावर करत नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला असून, या कामगिरीची देशभरात चर्चा होत आहे.









