महापौरांचे केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, पोलिस यंत्रणा सतर्क…!

---Advertisement---

 

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. महापौरांची अधिकृत गाडी तसेच महापालिका मुख्यालयातील केबिन बॉम्बने उडवून देण्याची धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि सायबर सेलने तातडीने तपास सुरू केला असून महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

एका अज्ञात व्यक्तीकडून महापौरांच्या कार्यालयाला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. या ई-मेलमध्ये महापौरांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचा दावा करत त्यांची गाडी आणि कार्यालय लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा मजकूर समोर आल्यानंतर प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता तात्काळ सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले.

या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरले असून सायबर सेलच्या तज्ज्ञांकडून ई-मेल पाठविण्यात आलेल्या आयपी अ‍ॅड्रेसचा मागोवा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, त्यामागे एकच व्यक्ती आहे की एखादा गट कार्यरत आहे, याचा शोध घेतला जात आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. महापौरांच्या केबिन परिसरात विशेष सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या अधिकृत दौऱ्यांदरम्यान आणि प्रवासादरम्यानही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धमकी केवळ खोडसाळपणातून देण्यात आली आहे की यामागे काही गंभीर कट रचला गेला आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांकडून विविध तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

मुंबईसारख्या संवेदनशील शहरात लोकप्रतिनिधींना मिळालेल्या अशा प्रकारच्या धमक्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येणार असून पोलिसांकडून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---