---Advertisement---
पंढरपूर-(अभिजीत अवताडे)
श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या दीर्घकालीन जतन व संवर्धनासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने २३ व २४ जून रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. या कालावधीत मूर्तींवर विशेष संरक्षणात्मक लेपन व संवर्धनाची कामे केली जाणार आहेत.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भात मंदिर समिती, पुरातत्त्व विभाग आणि तांत्रिक तज्ज्ञ यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, मूर्तींची पावित्र्यता, सुरक्षितता आणि भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन हे लक्षात घेऊन संवर्धनाची प्रक्रिया हाती घेण्यात येत आहे. या काळात मंदिरात सर्व प्रकारचे दर्शन बंद राहणार असून भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, मूर्ती लेपन प्रक्रिया भारतीय पुरातत्व संरक्षण सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर व राज्य पुरातत्व विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे पुरातत्त्व विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारशीच्या आधारे होईल. या प्रक्रियेसाठी दिनांक २३ व २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तेव्हा या कालावधीत मंदिर प्रशासनास भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
गेल्या काही दशकांत मूर्तींवर नैसर्गिक झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सूक्ष्म भेगा, झिजलेले भाग आणि मूर्तींच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना या संवर्धन मोहिमेत केल्या जाणार आहेत. त्यामुळे मूर्तींचे आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे.
यापूर्वीही विविध कालखंडात जसे १९८८ .२००५, २०१२, २०२० अशाच प्रकारे संवर्धनाची कामे करण्यात आली होती. यंदाची प्रक्रिया आधुनिक तांत्रिक निकषांनुसार आणि पुरातत्त्व विभागाच्या शिफारशींनुसार राबविण्यात येणार असल्याने मंदिराच्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाच्या संरक्षणाला बळ मिळणार आहे. मंदिर बंद असलेल्या दोन दिवसांत भाविकांनी प्रतिमा दर्शन किंवा नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असेही सुचविण्यात येत आहे.









