---Advertisement---
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याची चर्चा सुरू असून, तृणमूल काँग्रेसमधील 20 खासदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याचे माहिती समोर आली आहे. या खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. या गटाचे नेतृत्व काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर काकोली घोष दस्तीदार यांनी कथितरित्या सांगितले की, तृणमूल काँग्रेसमधून निवडून आलेले 20 खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मागत असून, ते पुढे नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहेत. तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पाठिंबा देण्याचाही निर्णय त्यांनी जाहीर केल्याचे वृत्त आहे.
सुदीप बंद्योपाध्याय यांनीही या गटाच्या विलीनीकरणासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज सादर करण्यात आल्याचे सांगितले. 20 जुलैपूर्वी स्वतंत्र कार्यालय आणि गटाला मान्यता मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे.
या घडामोडींमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, तृणमूल काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बंडखोर खासदारांमध्ये काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय, सुदीप बंद्योपाध्याय, सयानी घोष, माला रॉय, दीपक अधिकारी (देव), युसूफ पठाण, जून माल्या, प्रसून बनर्जी, शर्मिला सरकार, मिताली बाग, अबू ताहिर आणि खलिलुर रहमान यांच्यासह अनेक खासदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर तृणमूल काँग्रेसकडून अधिकृत भूमिका काय असणार आणि या दाव्यांबाबत पुढे काय घडामोडी होणार, याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









