पारोळा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सावखेडा येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….!

---Advertisement---

 

पारोळा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सावखेडा होळ फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नामदेव पांडुरंग पाटील (वय ५५, रा. सावखेडा होळ, ता. पारोळा ) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या भीषण अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत नामदेव पाटील हे मूळचे सावखेडा होळ येथील रहिवासी असून, सध्या आपल्या परिवारासह कामधंद्यानिमित्त गुजरात मधील सुरत येथे वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वीच ते काही घरगुती कामासाठी गावी आले होते. बुधवार, २४ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते गावाच्या फाट्याजवळून सुरत येथे परत जाण्यासाठी पायी चालत निघाले होते. रात्री सुमारे ९.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील सावखेडा होळ फाटा आश्रमासमोर एका भरधाव आणि अनियंत्रित अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, पाटील यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत होऊन जागेवरच मोठा रक्तस्राव झाला.

मृत नामदेव पाटील यांचे लहान भाऊ विनायक धर्मसिंग पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या एका मित्रासोबत रात्री जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. सावखेडा होळ फाटा आश्रमासमोर आले असता, त्यांना रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, ते त्यांचे मोठे भाऊ नामदेव पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

या अत्यंत दुर्दैवी घटनेबाबत मृत शेतकऱ्याचे भाऊ विनायक धर्मसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे हे करत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---