---Advertisement---
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपी सलमान शेख उर्फ अब्बुस खान (वय २८, रा. हबीब नगर, चोपडा) यास चोपडा येथील न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
माहितीनुसार, १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचे पती मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरात अल्पवयीन मुलगी व तिची लहान बहीण होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान फिर्यादी, पीडित मुलगी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांवरून आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
सदर खटल्याची सुनावणी मा. श्रीमती सी. व्ही. पाटील भंडारे (जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, चोपडा) यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. गजानन मंगळकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायद्याच्या कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३३२ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुशल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासकामी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.









