पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला. मुस्लिम नसल्याची खातरजमा करत केलेल्या हिंदूंच्या अमानुष हत्याकांडात निरपराध पर्यटकांचा बळी गेला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देश एकीकडे हादरलेला असताना, दुसरीकडे काही नेते, तथाकथित पुरोगामी मंडळी आणि हिंदूत्व सोडलं नाही असे वारंवार सांगत फिरणारी मंडळी या हत्याकांडाच्या पृष्ठभूमीवर स्वतःचा राजकीय अजेंडा रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. हा हल्ला केवळ एक दहशतवादी कृत्य नव्हते तर ते धर्माच्या आधारावर हिंदूंना टिपून मारणारे अमानवी कृत्य होते. पण हिंदुत्व न सोडलेले उबाठा गटाचे नेते संजय राऊत सरकारने आता, हिंदू-मुसलमान करू नये, हिंदू-मुसलमान आपसात काय ते बघून घेतील. सरकारने राष्ट्रीय हिताचा विचार करावा. मोदी हे पहलगाम हल्ल्याने हादरले आहेत. त्यामुळेच सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट टाकून ते परत आले आहेत. असले अकलेचे तारे तोडताना दिसत आहेत. मुळात या बोलघेवड्याच्या बोलण्याला कोणीही भीक घालत नाहीत. त्याला फार महत्त्व देखील देत नाही. मात्र, या वक्तव्याच्या निमित्ताने एक प्रश्न मनात निर्माण झाला तो म्हणजे भ्याड हल्ल्यामुळे देश संकटात असताना देशाचे पंतप्रधान आपला पूर्वनियोजित शासकीय दौरा अर्धवट सोडून देशात परतले. मात्र, या संकटसमयी विदेशातील थंड हवेच्या ठिकाणी मौजमस्तीसाठी खाजगी दौऱ्यावर गेलेले याच राऊतांचे मालक मात्र परत आले नाहीत. देशावर प्रघात, हिंदूवर हल्ला झालेला असताना उद्धव ठाकरे कुठाय?, ते का परत आले नाहीत देशात?, ते नाही तर नाहीत त्यांचे महाज्ञानी युवराज तरी यायला पाहिजे होते, ते तरी कुठाय? असा प्रश्न देशवासीयांना आता पडला आहे.
खरं सागायचं झालं तर, तशी यांची ही नेहमीची सवय आहे. कोरोना काळात राज्यातील जनता मृत्युमुखी पडत होती. तेव्हा हे मुख्यमंत्री होते आणि बिळात सॉरी, घरात बसून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शहाणपणा शिकवत होते. मग आज कोणत्याही बिळात असूद्यात, परत नाही आले तर नाही. किमान एक फेसबुक लाईव्ह तर होऊन जाऊ द्यायचं होतं. गेलाबाजार साधं द्विट तरी… पण संवेदनशीलता काय असते, हे एकूणच ठाकरे नावाच्या व्यक्तींना आणि त्यांची गुलामगिरी करणाऱ्यांना माहिती असण्याचं कारण नाही आणि त्यांना सांगून उपयोग देखील नाही. त्यांचं कसं कायम “लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण…” अशी अवस्था असते.
हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, महाराष्ट्रातून ज्या पक्षाचे नऊ खासदार आहेत, वीस आमदार आहेत, दोन राज्यसभा खासदार, तर सात विधान परिषद आमदार आहेत त्या उबाठा गटाचा एकही प्रतिनिधी उपस्थित झाला नाही. उद्धव ठाकरे परदेशात फिरायला, मजा मारायला गेले आहेत. एवढा क्षुल्लकशा घटनेसाठी ते आपली मौजमस्ती सोडून परत यायला काय पंतप्रधानांसारखे संवेदनशील आणि भावनिक थोडी आहेत. सध्यातर ते “बडे बडे शहरों में, ऐसी छोटी छोटी घटनाएं तो होती रहती है…” असे म्हणणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले असताना, अशी काही घटना घडल्यानंतर ते लगेचच परदेशातून परत यायला वेडे थोडी आहेत? पण धर्म विचारून हिंदूंना टिपून मारलं, याचं दुःख ठाकरेंना का झालं नसावं? धर्माच्या नावावर झालेल्या या कत्तलीवर ठाकरे गप्प का? पंतप्रधान शासकीय दौरा सोडून येतात, राहुल गांधी देखील आपला अमेरिका दौरा सोडून येतात. मात्र, उद्धव ठाकरे येत नाहीत याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा? महापुरात जसं बापाला सोडून विदेशात गेले तसेच देश संकटात असताना हे आज विदेशात गेले आहेत. संकटसमयी बुडाला पाय लावून पळणे हा मूळ स्वभाव गुण असल्याने मुळात “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार…
बरं मालक विदेशात मौज करत आहेत पण लोकसभेचे गटनेते अरविंद सावंत आणि राज्यसभेचे गटनेते संजय राऊत हे रिकामचोट नाही तेव्हा दिवसभर टिवल्याबावल्या करत फिरताना दिसतात. आणि “शिकार के वक्त कुत्ता ……. गया.” म्हणीप्रमाणे देशाच्या दुर्गम भागात दौऱ्यावर असल्याचे सांगून बैठकीला अनुपस्थित राहतात. देशातला असा कोणता दुर्गम भाग आता असा राहिला आहे जिथून एका दिवसात दिल्लीला पोहचता आलं नसतं. पण मुळात यायचं नव्हतं, साऱ्या संवेदना मेल्या आहेत, या उबाठावाल्यांच्या. यांना केवळ कुठल्याही घटनेचं राजकारण करायचं आहे.
हिंदू-मुस्लिम विचारले, हे कोणी भाजपावाले किंवा केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे सांगत नाही. ज्यांच्यावर बितली, ज्यांनी थरार अनुभवला, ज्यांनी आपला कुटुंबातला सदस्य गमावला, ज्यांनी आपला पिता, पती, मुलगा गमावला, असे पीडित आप्तस्वकीय सांगत आहेत की, नावं विचारली, हिंदू लग रहा है म्हणून गोळी झाडली, कलमा पढे म्हटलं, नाही म्हटल्या म्हणून गोळी झाडली, ‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले’, ही वस्तुस्थिती पीडित लोक सांगत आहेत. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. डोंबिवलीतील ज्या मोने, लेले आणि जोशी कुटुंबाने कर्ते पुरुष गमावले, तेदेखील ओरडून ओरडून ‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून आम्हाला लक्ष्य केलं’ असेच सांगत आहेत. घटनास्थळावरील अन्य पर्यटकांनीही याला दुजोरा दिला. असे असताना, या कटू सत्याला ‘फेक नॅरेटिव्ह’ कसे ठरवता येईल? ‘धर्माच्या नावावर हल्ला झाला नाही’, ‘हिंसा कोणत्याही धर्माशी जोडू नका’ या सगळ्या बोलण्यातून राजकारणाचा वास येतो. काही लोक सेक्युलरतेचा दिखावा करण्यासाठी काही तथाकथित पुरोगामी मंडळी, उबाठासारखी ‘बाळबोध’ मंडळी यातूनही हिंदू-मुस्लिम तेढीचे राजकारण करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या या निषेधार्ह कृतीतून, माणुसकीच्या हत्यारांचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण होते आणि बळी गेलेल्यांच्या वेदनेचा अपमान होतो. याचे त्यांना भान राहिलेले नाही आहे.
या भ्याड दहशतवादी हल्ल्यातून देश अजून सावरलेला नाही. जेव्हा सरकार, प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सर्व ताकदीने दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी कामाला लागले आहेत, अवघा देश संताप व्यक्त करत असताना, उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी, एवढ्या संवेदनशील विषयाप्रसंगी मेलेल्यांना गोमूत्र पाजून जिवंत करणार का? असं म्हणत मृत्युमुखी पडलेल्यांची कुचेष्टा चालविली आहे, हिंदू असल्यामुळे ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांना हिणवण्याचं काम हा महाशय करत आहे. अतिशय नाजूक परिस्थितीतून देश जात असताना, सर्व विरोधी पक्ष, सर्व देशवासी एकत्र आले असताना, देशातील मुस्लिम, इतिहासात कधीही न झालेलं काश्मीरमध्ये काश्मिरी मुसलमान देखील सरकारसोबत असल्याचं सांगत रस्त्यावर उतरले असताना, ‘अमित शाहांनी राजीनामा द्यावा आणि देशावर मेहरबानी करावी’ असे विधान म्हणजे या टिनपाटाच्या बेजबाबदारपणाचा, असंवेदनशीलतेचा कळस आहे.
नागेश दाचेवार – ९२७०३३३८८६