गोशाळेत भीषण आग; लाखोंचा चारा जळून खाक, गायींसमोर अन्नटंचाईचं संकट

---Advertisement---

 

नशिराबाद परिसरातील बेळी गावाजवळील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथे सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या अखत्यारीत चालणाऱ्या भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेत शुक्रवारी दुपारी मोठी आग लागून गंभीर नुकसान झाले. दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास चाऱ्याच्या साठवण गोडाऊनमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने वेग घेत संपूर्ण गोदामाला वेढा घातला.

उन्हाचा कडाका आणि वाढलेले तापमान यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीमुळे हजारो क्विंटल चारा जळून खाक झाला असून, अंदाजे १०० आयशर इतक्या प्रमाणात साठा नष्ट झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत १० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच गावातील युवक, गोसेवक आणि संस्थेचे कर्मचारी तत्काळ मदतीला धावले. धुराचे लोट, आगीच्या उंच ज्वाळा आणि प्रचंड उष्णतेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, नशिराबाद नगर परिषदेचे चार अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलातील ललित भोळे आणि दुर्गादास माळी यांनी सहकाऱ्यांसह सतत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले.

आग पसरू नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने उरलेला चारा बाहेर काढण्याचे कामही करण्यात आले. अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे आग गोशाळेच्या इतर भागात पोहोचली नाही. अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनावरांचे जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

या गोशाळेत सुमारे ३०० ते ३५० गायींचे पालन केले जाते. मात्र मोठ्या प्रमाणात चारा जळून गेल्याने गोशाळेसमोर आता चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गायींच्या संगोपनाबाबत चिंता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर संस्थेने समाजातील नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि गोभक्तांना मदतीचे आवाहन केले आहे. गोसेवेकरिता चारा तसेच आर्थिक सहाय्य देण्याची विनंती संस्थेकडून करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---