चोपड्यावर शोककळा: चारधाम यात्रेदरम्यान भाविक महिलेचे निधन; बद्रीनाथाच्या दर्शनाची आस अपूर्णच

---Advertisement---

 

चोपडा (जळगाव): तालुक्यातील पंकज नगर परिसरातील रहिवासी प्रतिभा नारायण बोरोले (वय ५९) यांचे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान दुःखद निधन झाले. यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथचे दर्शन झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात बद्रीनाथचे दर्शन घेण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेमुळे संपूर्ण चोपडा शहरासह जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा बोरोले या १६ भाविकांच्या गटासोबत १६ दिवसांच्या चारधाम यात्रेसाठी गेल्या होत्या. त्यांनी यात्रेदरम्यान यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या तीन धामांचे दर्शन पूर्ण केले होते. मात्र, शेवटचा टप्पा असलेल्या बद्रीनाथ दर्शनाच्या आदल्या रात्री त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोंगराळ भागातील कमी ऑक्सिजन आणि वाढती अस्वस्थता यामुळे त्यांची प्रकृती खालावली.

​सहप्रवाशांनी त्यांना तातडीने चमोली जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देऊन वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने १ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

​या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी तात्काळ पावले उचलली. त्यांनी उत्तराखंडमधील स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून सर्व कायदेशीर व वैद्यकीय सोपस्कार जलदगतीने पूर्ण केले. मंत्री खडसे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्रतिभा बोरोले यांचे पार्थिव विमानाने मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

​प्रतिभा बोरोले या चोपड्याचे माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी, पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वहिनी आणि माजी उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या काकू होत्या. कुटुंबातील एक ज्येष्ठ आणि धार्मिक वृत्तीची व्यक्ती म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी बोरोले कुटुंबाप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---