कुंभमेळ्यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर; नाशिकमध्ये नवीन विद्युत उपकेंद्रांची उभारणी

---Advertisement---

 

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर कामाला लागले आहे. वीज यंत्रणेच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी महावितरणचे संचालक सचिन तालेवार यांनी नाशिक रोड येथील ‘विद्युत भवन’मध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली.
या बैठकीत कुंभमेळ्याच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि पंकज तगलपल्लेवार यांची यावेळी उपस्थिती होती.


सचिन तालेवार यांनी स्पष्ट केले की, कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात वीज सेवा सुरक्षित, अखंडित आणि दर्जेदार ठेवणे ही सर्वोच्च प्राथमिकता असेल. यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय राखत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास त्वरित दुरुस्ती करता यावी यासाठी पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी गोदापार्क, भद्रकाली, नांदूर–मानूर आणि तळवाडे या ठिकाणी नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून, सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


बैठकीनंतर तालेवार यांनी शहरातील प्रस्तावित उपकेंद्रांच्या ठिकाणांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच कामाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला अधीक्षक अभियंते देवेंद्र सायनेकर, राजेश थुल, तसेच कार्यकारी अभियंते चेतन वाडे, शितलकुमार घुमे, नितीन पगारे आणि संबंधित कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---