Jalgaon News जळगाव : पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोड जवळील सोनी नगरात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. शुक्रवारी (१६ मे ) रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे घरासमोर पाण्याचे डबके साचल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत. सोनी नगरातील उर्वरित रस्त्यांचे तात्काळ काँक्रिटीकरण करण्यात यावे अशी मागणी मनपा प्रशासनाकडे या रहिवाशांनी केली आहे.
सोनी नगर ही चार गल्ल्या असलेली कॉलनी आहे. यातील दोन गल्लीत रस्त्यांचे वर्षभरापुर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. धनंजय सोनार यांच्या घरापासून ते स्वयंभू महादेव मंदिर परिसरात रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहेत. यातच शुक्रवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे रहिवाश्यांच्या घरासमोर पाण्याचे डबके साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या डबक्यामुळे डासांची उत्पती होऊन लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची कोणीही दखल घेत नसल्याने सोनी नगरातील रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला.
गल्लीत साचलं पाणी
दरम्यान, बुधवारी (१४ मे ) सोनी नगरातील रहिवाशांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेऊन आपली आपबिती सांगून रस्त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी केली. आमदारांनी परिसरात पर्याय म्हणून मुरूमचा भराव करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, शुक्रवारी (१६ मे ) अवकाळी पाऊस पडल्याने थेट घराच्या ओट्यावर पाणीच पाणी साचल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. सोनी नगरात एकूण चार गल्ल्या असून दोन गल्लीत सिमेंट काँक्रिटचे रस्ते पूर्ण झाले. तिसऱ्या गल्लीत अर्धा रस्ता केला, मात्र अर्धवट रस्ता केल्याने अमृत योजनेच्या नळाचे पाणी आले की, नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे डबके साचते त्यात अवकाळी पावसामुळे तर घराच्या दारासमोर पर्यंत पाणी साचले होते. पाणी काढताना नाकीनऊ आले होते.
समस्या कोणाकडे मांडू
या अर्धवट रस्त्याच्या समस्येकडे कोणीही लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे आपली व्यथा मांडली. मात्र, त्यांनीही केवळ आश्वासन दिले. तिसऱ्या गल्लीचा रस्ता होऊन तीन महिने झाले मात्र अर्धवट रस्ता महादेव मंदिरापर्यंत कधी पूर्ण होईल अशी अपेक्षा वार्ड क्रमांक १० चे सामाजिक कार्यकर्त व नगरसेवक यांच्याकडे नागरिकांकडून होत आहे. पावसाळा लवकरच सुरु होणार आहे त्यापूर्वी लवकरात लवकर अपूर्ण रास्ता पूर्ण करावे अशी मागणी सोनी नगरातील नागरिकांनी केली आहे.