जळगाव : महापालिका हद्दीतील खेडी बुद्रुक शिवारातील गट नंबर ११, १२ व १३ मधील रहिवाशांनी १८ मीटर रुंदीच्या मुख्य वाहतूक रस्त्यावर होत असलेल्या पुलाच्या वळणामुळे भविष्यातील अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो. सतत रहदारी असणाऱ्या रस्त्याला या वळणांमुळे अपघाताचे निमंत्रण मिळत असून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून अतिक्रमण संपूर्णपणे हटवावे. तसेच पुलाला दक्षिण-उत्तर सरळ दिशा द्यावी, जेणेकरून वाहतुकीस कोणताही धोका निर्माण होणार नाही अशी मागणी या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी (२१ मे ) निवेदनाद्वारे केली.
खेडी बुद्रुक शिवारातील पुलाचे बांधकाम ५ एप्रिल २०२५ पासून सुरू आहे. हा पुल जळगाव शिवार गट नंबर ५९, ६० व खेडी बुद्रुक गट नंबर ११, १३ या भागांना जोडणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, नागरिकांचे म्हणणे आहे की पुलाला सरळ दिशा न देता त्यास वळण देण्यात येत आहे, जे पूर्णपणे अयोग्य असून अपघातांना निमंत्रण देणारे आहे.
दोन्ही बाजूच्या रस्त्यांचा समन्वय नसल्याने पुलाला वळवून जोडणी केली जात आहे, ज्यामुळे भविष्यात अपघातांची शक्यता वाढू शकते.
गट नंबर १३ मधील प्लॉट नं. ८ च्या घर क्रमांक १ च्या दक्षिणेकडील भिंतीपासून नाल्यापर्यंतची जागा ही अतिक्रमित आहे. पुलाला सरळ रचना देता येऊ शकते, परंतु संबंधित बिल्डर दिनेश अत्तरदे यांनी तात्पुरत्या शेडच्या नावाखाली अतिक्रमण केले आहे. पुलाला सरळ दिशा द्यावी व अतिक्रमण हटवावे अशी विनंती नागरिकांनी वेळोवळी महापालिका आयुक्त, नगररचना व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे अर्ज करून केली आहे. मात्र, मनपाकडून याकडे दुर्लक्ष करून बिल्डरच्या दबावाखाली अतिक्रमण कायम ठेवण्यात येत आहे. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही महापालिका त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे .
रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, या ठिकाणी तातडीने पाहणी करून अतिक्रमण संपूर्णपणे हटवावे. तसेच पुलाला दक्षिण-उत्तर सरळ दिशा द्यावी, जेणेकरून वाहतुकीस कोणताही धोका निर्माण होणार नाही. निवेदनावर प्रतिभा पाटील, सुवर्णा कुंभार ,आरती पाटील ,भावना पाटील ,उषा सोनवणे , जितु सोनवणे , प्रतिक्षा सोनवणे ,,अर्जुन मराठे ,अशा मराठे ,करुणा मराठे, ईदूबाई पवार , शिवानी पवार आदींची स्वाक्षरी आहे.