जळगाव : जळगाव नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतरण झाल्यानंतर तब्बल २३ वर्षानंतर शहर हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासन राज्य शासनाकडे सादर करणार आहे. ही हद्दवाढ २०२९ पर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जळगाव शहराची मुळ हद्द १९९३ मध्ये नगरपालिका असतांना ठरविण्यात आली. त्यानंतर सन २००२ मध्ये जळगाव शहराचा विकास आराखडा (डीपी ) मंजूर झाला. यात जळगाव शहराजवळ असलेली मेहरूण, पिंप्राळा ही गावे जोडण्यात आली. या ठिकाणच्या ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली व या गावांचा जळगाव नगरपालिकेत समावेश करण्यात आला. आजच्या घडलेला शहराचे क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किलोमीटर आहे.
शहराचा चहुबाजूने विस्तार होत असून आजच्या एरंडोलकडील बाजूस गिरणा नदीच्या अलीकडे शहराची हद्द आहे. कानळद्याकडील बाजूस अर्धे आव्हाणेशिवार गावाची हद्द आहे, ममुराबाद कडीलबाजूस जुन्या ममुराबाद शेती फार्मपर्यंत, तर नशिराबाद डील बाजूस खेडी गावापर्यंत आणि नेरी गावाकडील बाजूला कुसुंबा गावाच्या अलीकडेपर्यंत, तर पिंप्राळ्याकडे सावखेडे गावच्या शिवारपर्यंत शहराची हद्द आहे. शासनाने २००३ मध्ये जळगाव नगरपालिका बरखास्त करून २१ मार्च २००३ रोजी महापालिकेची स्थापना केली. परंतु, शासनाने कोणतीही हद्दवाढ केली नाही. नगरपालिका असतांना जी हद्दवाढ होती तीच हद्दवाढ आजपर्यंत कायम आहे.
आजच्या स्थितीत पाहील्यास या सर्व गावापर्यंत रहिवाशी विस्तार पसरला आहे. अनेक ठिकाणी बांधकामे झालेली आहेत. आज त्या ठिकाणी सुविधा पोहचविणे ग्रामपंचायतीनाही शक्य नाही. तर हद्दीत नसल्यामुळे महापालिकाही या सुविधा देवू शकत नाही. त्यामुळे ही गावे जर जळगाव शहराच्या हद्दीत आली तर महापालिका त्या ठिकाणच्या रहिवाश्यांना रस्ते, पाणी, वीज, तसेच साफसाईच्या सुविधा देवू शकणार आहे.
हद्दवाढीत शहराजवळील गावे जळगाव महापालिका हद्दीत येण्याची शक्यता आहे. ही गावे मनपा हद्दीत सामाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव दिला जाईल. या प्रस्तावानुसार आव्हाणे, कुसूबा, मोहाडी, सावखेडा, निमखेडी, ममुराबाद ही गावे शहर हद्दीत येतील. या प्रस्तवास लवकर मंजुरी मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याने २०२९ पर्यंत त्याला मंजूरी मिळेल असा अंदांज व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव शहराची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणेनुसारच आजही गणली जात आहे. जळगाव शहराची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार २२८ इतकी आहे . दरम्यान, जनगणना झाल्यास शहराची लोकसंख्या वाढणार आहे. शहराचा विकास आराखडा २००२ नंतर आता होत आहे. पालिकेच्या नगररचना विभागातर्फे हा आराखडा सन २०२४ पासून सुरू आहे. यात आता शहरात नवीन हददवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात येईल. जळगाव शहराचा विस्तार पाहता तब्बल २३ वर्षानंतर हा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.