जळगाव : येथील जननायक थिएटर गृप, जी.एम. फाउंडेशन, भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तसेच आमदार सुरेश भोळे (राजुमामा) सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात सुरू असलेल्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिबिरार्थी व पालकांच्या आग्रहास्तव हे शिबिर आता २० दिवसांऐवजी ३० दिवसांचे करण्यात आले आहे.
नाट्यकलेची मूलभूत ओळख, रंगमंचीय भान आणि कलात्मक साक्षरता वाढविण्याचा मुख्य उद्देश असलेल्या या शिबिरात विविध वयोगटातील मुलांना अभिनय, अभिवाचन, नृत्य, नेपथ्य, वेशभूषा, संवादफेक, हालचाल व रंगमंचीय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

नाट्यगृह अभ्यासभेटीचा अभ्यासपूर्ण उपक्रम
शिबिराचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून रविवार २५ मे रोजी छत्रपती श्री संभाजीराजे नाट्यगृह येथे शिबिरार्थ्यांनी अभ्यासभेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रंगमंचीय अनुभव, तांत्रिक माहिती आणि नाट्यगृहाचा अंतर्गत कारभार समजून देणे हा होता. या भेटीत प्रशिक्षक होनाजी चव्हाण यांनी शिबिरार्थ्यांना रंगभूमीवरील अभिनयासाठी आवश्यक असणारे रंगमंचीय भान, रंगभूमीची रचना (अपस्टेज, डाउनस्टेज, विंग्ज, कूलिस आदी) याबाबत माहिती दिली.
व्यवस्थापक तेजस पाठक व अक्षय कुमावत यांनी रंगमंचावरील प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था, माईक ऑपरेशन, पार्श्वसंगीत, प्रोजेक्टर व नेपथ्य बदलाचे तांत्रिक पैलू समजावून सांगितले. याचबरोबर विद्यार्थ्यांना नाट्यगृहाच्या मागील भागातील ग्रीन रूम, मेकअप रूम, वॉर्डरोब सेक्शन, लाईट कंट्रोल रूम आणि ध्वनी नियंत्रण विभाग यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून घेण्यात आले.
संस्थांचे सहकार्य आणि स्वयंसेवकांचा हातभार
या शिबिराच्या आयोजनासाठी दिलीप चोपडा आणि मायटी ब्रदर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी राणी चव्हाण, अमोल सोनवणे, प्रतीक परदेशी, ज्ञानेश्वरी राणे यांच्यासह अनेक स्वयंसेवक सातत्याने मेहनत घेत आहेत.
कलाविकासाच्या दिशेने ठोस पाऊल
या शिबिरातून शिबिरार्थ्यांमध्ये कलात्मक आत्मविश्वास, सृजनशीलता, संवाद कौशल्य आणि सामाजिक जाण निर्माण होत असून, भविष्यातील दर्जेदार कलाकार घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मोलाचा ठरत आहे. नाट्यकलेप्रती बालवयातच आकर्षण निर्माण करून संस्कृतीशी नाते घट्ट करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.