जळगाव : महापालिका मालकीच्या महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनिसिपल व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी मनपाच्या ७ टक्के भाडे वाढीच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. सोमवारी (26 मे) रोजी विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार महापालिकेच्या समितीने भाडे वाढवून वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनिसिपल मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मत्ताणी यांनी याला विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनिसिपल मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मत्ताणी यांनी या निवेदनात सांगितले की, ‘मनपाच्या ७ टक्के भाडे वाढीचा हा निर्णय आमच्यावर अन्याय कारक आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी झाली तर अनेक लहान व्यापाऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले जाणार आहे.’ त्यांनी पुढे म्हटले आहे की, तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात स्पष्टपणे भाडेवाढ न करण्याचा शब्द दिला होता. आणि त्याचे व्हिडीओ पुरावेही आमच्याकडे आहेत. शासनाकडून भाडेविषयक स्पष्ट निर्देश असतानाही महापालिका मनमानी पद्धतीने ७ टक्के भाडेवाढीचा निर्णय घेत आहे, जो शासनाच्या आदेशाचा अवमान आहे.
व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे की, मुख्यमंत्री व शासनाच्या आदेशानुसारच सन २०१२ पासूनची भाडे आकारणी करण्यात यावी. अन्यथा व्यापाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. “जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही कुटुंबासह महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडून उपोषणास बसू, असा इशारा मत्ताणी यांनी दिला आहे.