Jalgaon News : भडगाव तालुक्यात पळासखेडे ग्राम पंचायत अंतर्गत शौचालय घोटाळा उघड झाला आहे. यात ३१ लाख ८४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी विभागीय आयुक्तांनी तत्कालीन ग्रामसेवक जिभाऊ पाटील व भास्कर बागुल यांना दोषी ठरविले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी या दोन्ही ग्रामसेवकांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी कारवाईची नोटीस बजावली आहे.
भडगाव तालुक्यातील पळासखेडे ग्रामपंचायतीतील शौचालय घोटाळ्याची साहाय्यक गटविकास अधिकारी यांनी चौकशी केली होती. यानंतर फेरचौकशी व अहवालात फेरबदल करण्यात आला होता. यासंदर्भातदेखील भडगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भडगाव तालुक्यात पळासखेडे येथे स्वच्छतागृह योजनेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय दोधा पाटील यांनी केली होती. यात तत्कालीन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी मयत असलेले ३५ लाभार्थी शौचालय योजनेत जिवंत दाखवून तब्बल २०७ देयके बनावटरीत्या पारित केली होती. तर तत्कालीन गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी शौचालयांच्या प्रस्तावांची फाईलच दारूच्या नशेत जाळून टाकल्याची घटना घडली होती.
या संदर्भात तत्कालीन भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी प्रस्तावांची फाईल जाळत्या प्रकरणात ११ संशयित व तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांना संशयितांची चौकशी करण्याची मागणी विजय दोधा पाटील यांनी केली होती. यात संगनमताने शौचालय घोटाळ्याच्या प्रस्तावाची फाईलच तत्कालीन गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी दारूच्या नशेत जाळली होती.
या नंतर भडगाव पोलीस ठाण्यात दप्तर व शौचालय फाईलीची चोरी झाली असल्याचा बनाव करीत खोटी फिर्याद संशयितांना व तत्कालीन दुसरे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना यातून बाहेर काढण्यासाठी रवींद्र जगताप यांच्यामार्फत देऊन खोटा फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात भडगाव पोलीस निरीक्षक व विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे फ रतक्रार दाखल करण्यात आली आहे.