भुसावळ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील चार दुकानांचे शटर फोडून रोकड व इतर साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. तसेच या चोरट्यांनी दोन दुकानाच्या बाहेरील एसीच्या तांब्याच्या नळ्या देखील कापून नेल्या आहेत. या चोरीने व्यापारी वर्गांत घबराहाट पसरली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या तळमजल्यावरील स्वराज्य पान सेंटर, टीडीसी कुरिअर कॅमेरा या ठिकाणच्या शटरचे कुलूपे तोडली. यात स्वराज्य पान सेंटर दुकानाचे दोन्ही शटर तोडून ४ ते ४.५ हजारांची रोकड, सिगारेट पाकिटे व इतर वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. तर सोहम डिजिटल कलर लॅब व आर. पी. इंटरप्रायझेस या दोन दुकानांच्या एसीच्या तांब्याच्या नळ्या बाहेरच्या बाहेर कापून नेल्या आहेत. हा सर्व चोरीचा प्रकार शुक्रवारी सकाळी नगरपालिकेचा सफाई कर्मचारी रवी सिंगोतिया यांच्या लक्षात आला.
त्याने लागलीच या चोरीची खबर पोलिसांना दिली. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांनी सपोनि गणेश धुमाळ, राजू सांगळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. या घटनेतील चोरटे यापूर्वीही शहरात अनेक चोरीच्या घटनांमध्ये सामील असल्याचे आढळले आहे. त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच अटक करून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिले.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये रात्री पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी केली आहे. दोन चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले असून, रेल्वे स्थानक परिसरात व्हाइटनर सारखी नशा करताना आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
