धक्कादायक! आईच्या कुशीतून 2 महिन्यांच्या बाळाला हिंस्त्र प्राण्याने उचलून नेले; बाळाचे हाडामासाचे अवशेष आढळल्याने खळबळ…..!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मामलदे शिवारात रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला अज्ञात हिंस्र प्राण्याने उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काठेवाडी गायींसह फिरणारे एक राजस्थानी कुटुंब मामलदे शिवारातील शेतात मुक्कामी थांबले होते. रात्री आई आपल्या दोन महिन्यांच्या बालिकेला कुशीत घेऊन झोपली होती. मात्र पहाटेच्या सुमारास बाळ कुशीत नसल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरडा केला.

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने परिसरात शोध घेतला असता काही अंतरावर बाळाचे अवशेष आढळून आले. त्यामुळे अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा संशय अधिक बळावला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून नेमक्या कोणत्या प्राण्याने हल्ला केला, याचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच वनविभागालाही माहिती देण्यात आली असून संबंधित प्राण्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना रात्री उघड्यावर झोपणे टाळण्याचे आणि विशेषतः लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---