---Advertisement---
गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या कार्यक्रमात तिहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुन्हा ह्याच घटनेची पुनरावृत्ती होत असल्याचं समोर आलं आहे. लग्नकार्यातील आनंदी वातावरण काही क्षणातच तणावपूर्ण बनल्याची घटना एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे येथे घडली आहे. मराठी शाळेच्या आवारात मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अरुण भिला पाटील (वय ४२, रा. बोरखेडा, ता. चाळीसगाव) हे लग्न समारंभासाठी हनुमंतखेडे येथे आले होते. बँडची गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून काही वेळापूर्वी आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी सूड उगविल्याचा आरोप आहे.
संदीप धोंडू बेडसे पाटील, महेश प्रकाश बेडसे आणि गोरख विजय पाटील यांनी फिर्यादीला गाठत हल्ला चढवला. मुख्य आरोपी संदीप बेडसे यांनी अरुण पाटील यांच्या पोटात चाकूने वार केल्याचे सांगितले जाते. तसेच विनय विकास उर्फ भैय्यासाहेब पाटील यांच्या डाव्या पायावरही वार करण्यात आला. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी श्रीकांत अंकुशराव पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी महेश प्रकाश बेडसे आणि गोरख विजय पाटील यांना अटक केली आहे.
प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लग्न समारंभातील आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.









