---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल येथे भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने समोरून येणा-या मोटार सायकलला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक अपघातस्थळी सोडून फरार झाला. हा अपघात दुपारी एक वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कासोद्या नाक्याजवळ झाला. यापूर्वी देखील अपघातस्थळी अनेक अपघात झाले असून याठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा या मागणीसाठी नागरिकांनी अनेकवेळा रास्तारोको
आंदोलन केले होते.
याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहरातील पाटील वाडा येथील दुपारी मंगेश शिवदास पाटील (वय-६६) रा. पाटील वाडा, हे दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डी एक्स १०९४ ने शेतात जात असतांना जळगाव कडून भरधाव वेगाने येणा-या कंटेनर क्रमांक डी डी ०१ एस ९१०३ ने त्यांच्या मोटार सायकलला समोरून जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर मंगेश पाटील यांना डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते रस्त्यावर पडले. मंगेश पाटील यांना गंभीर जखमी अवस्थेत त्यांचे पुतणे समाधान पाटील, पंकज पाटील, मनोज पाटील व नागरिकांनी कल्पना हॉस्पिटल येथे नेले असता त्यांचेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मयत मंगेश पाटील यांचे पच्छात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत समाधान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील तपास करीत आहेत.अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून पसार झाला.
दरम्यान कासोदा नाका परिसरात यापूर्वी देखील मोठे अपघात होऊन निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.या ठिकाणची ओळख अपघाती स्थळ म्हणून निर्माण झाली आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर या ठिकाणी होणा-या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असतांना नाही ने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी अंडरपास करण्यात यावा या मागणीसाठी नागरिकांनी अनेकवेळा रास्तारोको आंदोलन केले आहे. आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.









