जळगाव : कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने ममुराबाद गावाजळ धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच अंत झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश दिलीप पाटील (वय ३२, रा.आडगाव,ता.यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे.
यावल तालुक्यातील आडगाव येथील राजेश पाटील हे जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात पॅथालॉबी लॅबमध्ये कामाला होते. ते मंगळवार, ८ रोजी रात्री काम संपवून ते आपल्या दुचाकीने अडगावला घरी निघाले होते. ते रात्री ११ वाजता ममुराबाद गावाच्या पुढे आले असता यावलकडून जळगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ममुराबाद येथील काही तरुणांनी रस्त्याला कडेला पडलेल्या राजेशचा मृतदेह पाहिल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी राजेशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आडगाव येथील पुरुषोत्तम भालेराव या युवकाला अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर रात्रीच राजेशच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
राजेशच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, ८ वर्षाचा मुलगा, ५ महिन्यांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे.