भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या महिनाभरापासून एका बिथरलेल्या माकडाने उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या माकडाच्या हल्ल्यात सुमारे ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले होते. अखेर वनविभागाच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित माकडाला जेरबंद करून जंगलात सोडले.
माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी माकडांची एक टोळी गावात आली होती. त्यातील इतर माकडे निघून गेली; मात्र एक माकड गावातच थांबले. हे माकड आक्रमक बनून घरांच्या किचनमध्ये शिरणे, अन्नसामग्रीची नासधूस करणे तसेच एकट्या व्यक्तींवर हल्ला करणे असे प्रकार करत होते. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून एका व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. वनविभागाचे गोळेगाव वनपाल अनिल साळुंखे, वेल्हाळे वनरक्षक प्रसाद कुलकर्णी तसेच संरक्षण मजूर यांच्या पथकाने पाचोरा येथून पाचारण करण्यात आलेल्या माकड पकडणाऱ्या तज्ज्ञांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारच्या सुमारास संबंधित माकडाला पकडण्यात यश आले.
यावेळी सरपंच लक्ष्मण पाटील, माजी सरपंच तुषार पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केले. माकडाला सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद करून सायंकाळी जंगलात सोडण्यात आले.
माकड पकडण्यात यश आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वनविभागाच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.