---Advertisement---
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना ताज्या भाजीपाला-फळांची थेट खरेदी करता यावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकाराने राज्यभरातील प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील टोल नाक्यांच्या परिसरात ‘कृषी मॉल’ उभारले जाणार आहेत.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागणार नाही. टोल नाक्यांजवळच विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्चात मोठी बचत होणार असून, शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला माल शहरात नेण्यासाठी होणारा खर्च आणि वेळ यावरही नियंत्रण येणार आहे.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा ताज्या आणि दर्जेदार भाजीपाला-फळे मिळत नाहीत. मात्र, ‘कृषी मॉल’मुळे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करता येणार आहे. मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी झाल्याने बाजारभावाच्या तुलनेत येथे स्वस्त दरात ताजी उत्पादने मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खर्चातही बचत होणार आहे.
यापूर्वी शहरांमध्ये ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित आठवडी बाजार यशस्वी ठरले होते. त्याच धर्तीवर आता महामार्गांवर ही नवीन बाजारपेठ उभारली जाणार असून, ती शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मॉल्सच्या उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या असून, लवकरच राज्यातील प्रत्येक प्रमुख टोल नाक्यावर ही सुविधा कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.









