---Advertisement---
अमळनेर : रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. बहिणी आपला भाऊ दूर परगावी असणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतात, तर काहींना हे शक्य होत नसल्याने पोस्टद्वारे भावाला राखी पाठवत असतात. परंतु, शहरात असणाऱ्या एकमेव पोस्ट ऑफिसचे सर्व्हर मागील १५ दिवसांपासून डाऊन आहे. या तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाला पोस्टाद्वारे आपल्या भावांना राखी पाठविण्यापासून वंचित रहावे लागल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अमळनेर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहराची अंदाजित लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास पोहचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहराला दोन ते तीन उप डाकघर असणे आवश्यक आहे. मात्र, हा सर्वभार केवळ एकच पोस्ट ऑफिस असून येथूनच पोस्टाच्या विविध सुविधा व योजना पुरविण्यात येत असतात.
यात बचत खाते, आर्वती ठेव योजना, मासिक प्राप्ती योजना, सुकन्या योजना, पीपीएफ, मुदत ठेव, वरिष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, पोस्टल लाइफ इन्शुरन्स, ग्रामीण डाक विमा तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण, पीएम किसान तसेच शासनाच्या घरकुल, शालेय विद्यार्थी स्कॉलरशिप इत्यादींसारख्या योजनांचे डीबीटीद्वारे प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा होणाऱ्या लाभार्थ्यांची बचत खाते मिळून मुख्य डाकघरात अंदाजीत 50 हजाराच्या वर खातेदार आहेत.
या ग्राहकांसोबतच तालुक्यातील ग्रामीण भागातील 30 शाखा डाक घरांचे सर्व कामकाज व मारवड, अमळगाव या उपडाक घरांना वित्तीय पुरवठा देखील मुख्य पोस्ट ऑफिसमधूनच केला जातो. शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये दररोज रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, पार्सल, मनी ऑर्डर, पैसे काढणे व ठेवणे आदी खातेदारांची कामे मोठ्या चालतात.
परंतु, सुमारे पंधरा दिवसापासून सर्वर डाऊनमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला सह सर्व खातेदारांची महत्त्वाची कामे ठप्प पडली आहेत. त्यातच अजून भर पडली ती शनिवारी असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त पोस्टाने आपल्या भावांना स्पीड पोस्टाने राखी पाठविण्यासाठी येणाऱ्या महिला वर्गांची लगबग सुरु आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे महिला दररोज पोस्ट ऑफिसला फेऱ्या मारत आहेत. रक्षाबंधन सणाला केवळ दोन दिवस उरलेले असल्यामुळे या दोन दिवसात भावाला राखी न पोहोचण्यामुळे या मुख्य पोस्ट ऑफिसच्या भोंगळ कारभाराबद्दल महिला वर्गात तीव्र स्वरूपाची नाराजी पाहावयास मिळत आहे.
शहरात पूर्वी लोकसंख्या कमी असताना देखील मुख्यडाक घराव्यतिरिक्त प्रताप नगर व अमळनेर टाऊन अशी 2 उपडाक घरे होती. मात्र जिल्ह्याच्या मुख्य डाक विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे व तालुक्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता या दोन्ही कारणांमुळे बारा ते पंधरा वर्षांपूर्वीच दोन्ही उपडाक घरे अन्य ठिकाणी स्थलांतरित करून बंद करण्यात आली आहेत. आता मात्र मात्र शहराची झपाट्याने वाढलेली लोकसंख्या पाहता स्थानिक खासदार, आमदार यांनी जिल्हास्तरीय डाक विभागाशी पाठपुरावा करून दोन्ही उपडाकघरे शहरात पूर्ववत चालू करावी. अशी मागणी डाकघरातील सर्व त्रस्त खातेदारांनी केलेली असून त्याचबरोबर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलेला आहे.
पोस्ट मास्तर टी. एच.पाटील यांनी आवाहन केले की, डाक विभागात पंधरा दिवसापासून आयटी 2.0 नवीन प्रणाली लोड झाल्यामुळे सेंट्रल सर्वर प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा विस्कळीत झाली होती. आता मात्र सर्व यंत्रणा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. तरी सर्व खातेदारांनी सहकार्य करावे.
गृहिणी विजया प्रकाश ताडे यांनी सांगिलते की, त्यांचे माहेर मध्य प्रदेशातील बुरहानपुर हे आहे. दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी भावाला रजिस्टर पोस्टाने राखी पाठविण्यासाठी आठ ते दहा दिवसापासून फेऱ्या मारत आहे. रोज सर्वर डाऊन आहे. असे उत्तर कर्मचारी देत आहेत. आता मात्र मुख्य डाकघराच्या या भोंगळ कारभारामुळे दोन दिवसात भावाला राखी पोहोचणे शक्य नाही. याचे मनाला वाईट वाटत आहे.