---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बेकायदा वास्तव्य करत असलेली एक इराणी महिला आणि तिचा तीन वर्षांचा चिमुकला अखेर भारतातून इराणकडे रवाना करण्यात आला आहे. जळगाव पोलिसांनी ही कारवाई करत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

अनेक वर्ष भारतात वास्तव्यास असलेल्या या इराणी महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली विमानतळावर नेले. भारत देश सोडताना विमानतळावर ती महिला भावूक झाली होती. डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर उदास भाव आणि चिमुकल्याला घट्ट मिठीत धरून तिने भारताला निरोप दिला.
---Advertisement---
या प्रकरणात जळगाव पोलिसांनी इराणी दूतावासाशी थेट संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. त्यानंतर विमानाद्वारे महिलेला आणि तिच्या मुलाला इराण देशात रवाना करण्यात आले.
दरम्यान, या महिलेला बेकायदा आश्रय दिल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, एका संशयिताचा पाकिस्तानातील काही मोबाईल नंबरशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय संदर्भ असल्याची शक्यता तपास यंत्रणा नाकारत नाही.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, जळगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.









