चैत्रोत्सवात सप्तशृंगगडावर भक्तांचा महासागर! चौथ्या दिवशी ५१ हजार भाविक नतमस्तक; पाचव्या दिवशीही उसळली प्रचंड गर्दी

---Advertisement---

 

सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव व चैत्रोत्सव हे प्रमुख उत्सव असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. ‘देवीच्या माहेरची माणसं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाविकांचा विशेष ओघ चैत्रोत्सवात पाहायला मिळतो. पुढील ध्वज मिरवणुकीपर्यंत गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाच्या पाचव्या दिवशीही भाविकांचा प्रचंड ओघ कायम असून, पंचामृत महापूजेनंतर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. उत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर व सप्तशृंगगड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संजय देवरे यांनी सहपत्नी पंचामृत महापूजा केली. सकाळी पुरोहितांच्या मंत्रघोषात पंचामृत महापूजा संपन्न झाली. गाभाऱ्यातील आकर्षक फुलसजावट, देवीला परिधान केलेले निळ्या रंगाचे भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकार यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. सकाळी ९.२५ वाजता दर्शनाची बारी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचल्याने गर्दीची तीव्रता स्पष्ट झाली.चौथ्या दिवशी यात्रेतील उच्चांक नोंदवला गेला. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या दर्शन रांगा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होत्या. या दिवशी सुमारे ५१ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले, तर २४ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पाचव्या दिवशीही तोच उत्साह कायम असून, गड परिसर ‘आई सप्तशृंगी देवीच्या’ जयघोषाने दुमदुमला आहे.

खान्देशासह पिंपळनेर, नंदुरबार, नवापूर, धुळे, जळगाव तसेच मध्यप्रदेश व गुजरात व विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक गडावर दाखल होत आहेत. अनेक पालख्या, दिंड्या व पायी चालत येणारे भाविक यामुळे गडावर भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळत आहे. काही पालखी दिंड्यांना ३० ते ४० वर्षांची परंपरा असून, भाविकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरत आहे.
उत्सव काळात भाविकांसाठी दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद), २४ तास खुले दर्शन, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व पानपोई, तसेच अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्ट, पोलिस, ग्रामपंचायत, महसूल व आपत्ती व्यवस्थापन पथक सतत कार्यरत आहेत.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, नानाजी भामरे, प्रशांत निकम, मंदिर सह विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, सुनील कासार, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख यांच्यासह नारद आहिरे, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित, शाम पवार, विजय भवरे, तसेच ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके ग्रामसेवक संजय देवरे, सदस्य राजेश गवळी, पोलिस पाटील शशिकांत बेनके, ट्रस्ट प्रशासन, पोलिस ,ग्रामपंचायत, पुरोहित वर्ग, महसूल,आपत्ती व्यवस्थापन पथक, मरसुम अधिकारी व कर्मचारी आदी प्रयत्नशील आहेत. भाविकांनी प्रशासनास सहकार्य करून शिस्त पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---