---Advertisement---
नशिराबाद शहरातील पेठ परिसरात वारंवार घडणाऱ्या दुचाकी जळीत घटनांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अखेर गुरुवारी नशिराबाद पोलीस स्टेशनवर धडक देत घेराव घातला. शेकडोच्या संख्येने पुरुष व महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये एकत्र येत पोलिसांच्या ढिसाळ तपासाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.
पेठ भागात गेल्या काही महिन्यांत दुचाकी जाळण्याच्या सलग तीन घटना घडल्या असून, प्रत्येक वेळी अज्ञातांकडून मध्यरात्री दुचाकींना आग लावण्यात आली आहे. मात्र इतक्या गंभीर घटनांनंतरही पोलिसांच्या तपासाला कोणताही ठोस धागा लागलेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना जाब विचारला.
“आमच्या भागात एक-दोन नव्हे तर तीन दुचाकी जाळल्या गेल्या, पण आजपर्यंत पोलिसांकडून ठोस कारवाई दिसत नाही. तपास शून्य आहे. अशा परिस्थितीत आमच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी पोलिसांना धारेवर धरले.
स्थानिक रहिवाशांच्या मते, या घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी लोक आपली वाहने बाहेर लावायलाही घाबरत आहेत. “जे कोणी हे कृत्य करत आहेत ते सराईत गुन्हेगार असावेत. त्यांना वेळीच पकडले नाही तर अशा घटना वाढण्याची भीती आहे,” असेही नागरिकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परिस्थिती चिघळू लागल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दुचाकी जळीत प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगत आरोपींना लवकरच ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले.
पोलिसांच्या आश्वासनानंतर जमाव शांत झाला असला तरी, लवकरात लवकर आरोपींना अटक करून या घटनांना आळा घालावा, अन्यथा नागरिक पुन्हा तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही आंदोलकांनी दिला.









