संतप्त घटना ! फैजपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलकाची विटंबना; संतप्त नागरिकांचा ५ तास ‘रास्ता रोको’, ८ दिवसांत अटक करण्याची मागणी…..!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरातील हुतात्मा बापू वाणी चौकात शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची अज्ञात व्यक्तीने फाडफाड करून विटंबना केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास येताच शिवजयंती महोत्सव समिती व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत नसल्याने नगरपालिका व पोलीस प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. जबाबदारी कोणाची यावरून अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याने वातावरण अधिकच तापले.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. बाजाराचा दिवस असल्याने सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली आणि शहरातील मुख्य मार्गांवर मोठी कोंडी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विविध सामाजिक व धार्मिक मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

प्रशासनाकडून आठ दिवसांच्या आत दोषींना अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याबाबतही हमी देण्यात आली.

आंदोलनाचा समारोप शिवआरती, माल्यार्पण व जलाभिषेक करून करण्यात आला. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

फैजपूर शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण कायम आहे. पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला असून दोषींना लवकरच जेरबंद केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---