---Advertisement---
जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलने यंदाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. आयसीएसई (दहावी) परीक्षेत पलक सुराणा हिने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर आयएससी (बारावी) परीक्षेत अलेफिया शाकीर कुझेमा हिने ९२.७५ टक्के गुणांसह प्रथम येण्याचा मान मिळवला.
दहावीच्या परीक्षेला एकूण ३२ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये स्वयंम पाडे (९५.६० टक्के) द्वितीय, तर स्तुती गर्ग (९४.८० टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ८ विद्यार्थी असून ८० ते ९० टक्क्यांदरम्यान १५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
बारावीच्या परीक्षेत एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते. ट्विंकल प्रकाश ललवाणी (९१.७५ टक्के) द्वितीय, तर आर्यमान बोथरा (८९.७५ टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इंग्रजी, अकाउंट्स, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवले.
२००७ पासून सुरू झालेल्या अनुभूती निवासी स्कूलने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. विविध उपक्रम, स्पर्धा आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजक वृत्ती विकसित केली जाते.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन तसेच प्राचार्य देबासिस दास यांनी कौतुक केले. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या सहकार्यामुळेच ही यशस्वी परंपरा टिकून असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थापक भवरलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या संस्थेने उत्कृष्टतेचा ध्यास घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सांस्कृतिक मूल्यांची जोड दिली आहे. विद्यार्थ्यांचे हे यश शाळेचा तसेच संपूर्ण खानदेशाचा अभिमान ठरत असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









