---Advertisement---
नाशिक मधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण हे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात गाजतंय. आणि याच घडामोडींना आता वेगळं वळण मिळाल्याचे पहायला मिळत असून गेल्या दोन दिवसापासून अशोक खरात याच्या मुलाचे चौकशी होत होती आणि आता चौकशीचा फेरा सोसल्यानंतर तपास यंत्रणेची परवानगी न घेता भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात शहरातून फरार झाला आहे. या घटनेमुळे तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात यापूर्वीच शिर्डी येथे गुन्हा दाखल असलेली अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिने पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. आता तिच्या पाठोपाठ मुलानेही शहर सोडल्याने तपास पथकाची डोकेदुखी वाढली आहे.
माहितीनुसार, तपास पथकाने खरातच्या मुलाची दोन दिवस सखोल चौकशी केली होती. मात्र चौकशीदरम्यान त्याने तपासात अपेक्षित सहकार्य केले नाही. “सर्व माहिती वडिलांनाच आहे,” अशी भूमिका त्याने घेतल्याचे समोर आले आहे. तसेच वडिलांकडे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम पाहिल्याचेही त्याने सांगितले होते.
चौकशीनंतर हर्षवर्धन खरातला घरी सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोणतीही तपास यंत्रणेला कोणतीही पूर्वकल्पना न देता तो रात्रीतून शहरातून निघून गेला. विशेष म्हणजे, शहर सोडण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असताना देखील त्याने हा नियम पाळला नाही. त्याचा मोबाईलही बंद असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेमुळे तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संशयितांकडून पुरावे नष्ट होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
अशोक खरात याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे आरोप झाले होते. २०१३ मध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. त्यावेळी सेटलमेंटद्वारे प्रकरण मिटवण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले असून तपास यंत्रणा पुढील कारवाई करत आहे.









