आशियातील सर्वात महत्त्वाचा ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर’ महाराष्ट्रात; १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी राज्य सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

---Advertisement---

 

“भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. एआय, सेमीकंडक्टर्स, डेटा सेंटर्स आणि डीप-टेक यांसारख्या तंत्रज्ञानाच्या जोरावर महाराष्ट्र स्वतःला बदलाच्या केंद्रस्थानी प्रस्थापित करत आहे. आज महाराष्ट्र आशियातील सर्वात महत्त्वाचा ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर’ म्हणून उदयास येत असून देशातील ६० टक्के डेटा सेंटर्स एकट्या महाराष्ट्रात आहेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नवी दिल्ली येथे कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (CII) आयोजित ‘ॲन्युअल बिझनेस समिट २०२६’ मध्ये ‘व्हिजन फॉर इंडिया@१००’ या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी सीआयआयचे अध्यक्ष राजीव मेमाणी आणि महासंचालक चंद्रदीप बॅनर्जी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ पायाभूत सुविधा पुरेशा नसून, जेव्हा राज्याचा भूगोल बदलतो तेव्हाच अर्थव्यवस्था बदलते. समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवण बंदर यांसारखे प्रकल्प महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलत आहेत. या अभूतपूर्व वेगामुळेच महाराष्ट्रात आज भारताच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) ४० टक्के गुंतवणूक होत आहे.


डेटा सेंटर राजधानी: देशातील ६०% डेटा सेंटर्स आणि २४% ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) महाराष्ट्रात आहेत.

ऑटोमोबाईल हब: देशातील २०% ऑटोमोबाईल आणि ईव्ही उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

आर्थिक योगदान: ६६० अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह महाराष्ट्र भारताच्या जीडीपीमध्ये १५% योगदान देत आहे.

निर्यात: भारताच्या एकूण अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे.

२०३२ पर्यंत गडचिरोली ठरणार ‘ग्रीन स्टील’ हब
राज्याच्या संतुलित प्रादेशिक विकासावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “पुणे हे तंत्रज्ञानाचे केंद्र राहील, तर नागपूर लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होत आहे. विशेषतः गडचिरोली जिल्हा २०३२ पर्यंत भारताचे सर्वात मोठे ‘ग्रीन स्टील’ उत्पादक केंद्र बनेल.” छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ही शहरे नवीन युगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उदयास येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


२०३० पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. “अनिश्चिततेच्या जागतिक वातावरणात ‘विश्वास’ हीच खरी आर्थिक पुंजी आहे आणि महाराष्ट्राने आपल्या धोरणांतून गुंतवणूकदारांमध्ये तो विश्वास निर्माण केला आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीचे आणि महाराष्ट्राने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---