Assembly Election 2024 : आता ‘या’ मतदारांना घरीच बजविता येईल मतदानाचा हक्क, प्रशासनातर्फे अंमलबजावणीस प्रारंभ

जळगाव : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८५ वर्षांपुढील, अंथरुणाला खिळलेले किंवा जे दिव्यांग मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात शुक्रवारपासून गृह मतदानाच्या प्रक्रियेची अंमलबजावणी होणार आहे.

त्यानुसार एरंडोल मतदारसंघात शुक्रवार आणि शनिवार, जळगाव ग्रामीण शुक्रवार, जळगाव शहर मतदारसंघात बुधवार आणि गुरुवार, तर पाचोरा मतदारसंघात गुरुवार आणि शुक्रवार, अमळनेर आणि चाळीसगाव मतदारसंघातही ज्येष्ठ व दिव्यांग मतदानाचा हक्क गृहमतदानाद्वारे बजावणार आहेत. एरंडोल विधानसभा मतदारसंघात १७३ मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहेत. त्यासाठी १० पथके तैनात असून २ पथके राखीव आहेत. या प्रत्येक पथकात दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षक, तर एक व्हिडिओग्राफर, अशा ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक मतदारांसाठी शुक्रवार, ८ नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधितांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार असल्याचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनीष गायकवाड यांनी म्हटले आहे.


जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात ६२ मतदारांनी गृहमतदानाचे अर्ज दिले आहेत. त्यासाठी १० पथके तैनात असून २ पथके राखीव आहेत. मतदारांसाठी बुधवार, १३ आणि गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी संबंधितांच्या घरी जाऊन गृह मतदान घेण्यात येणार असल्याचे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी म्हटले आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १०४ मतदारांनी गृहमतदानासाठी अर्ज दिले आहेत. त्यात १० पथके तैनात असून २ पथके राखीव आहेत. मतदारांसाठी शुक्रवार, ८ नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जाऊन मतदान घेणार असल्याचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी म्हटले आहे. अमळनेर विधानसभा
मतदारसंघात १९० मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहेत. यात ८५ वर्षांवरील १४९ ज्येष्ठ आणि ४१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. त्यासाठी १० पथके तैनात असून २ पथके राखीव आहेत. हे पथक संबंधितांच्या घरी जाऊन म तदान घेतील, अशी माहिती अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात २४२ मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहेत. यात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. त्यासाठी १० पथके तैनात असून २ पथके राखीव आहेत. हे पथक गुरुवार, १४ आणि शुक्रवार, १५ नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जाऊन मतदान घेतील. अशी माहिती अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी दिली.


चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ११३ मतदारांनी गृहमतदानासाठी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज केलेले आहेत. यात ८५ वर्षांवरील ९४ ज्येष्ठ आणि १९ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. त्यासाठी ८ पथके तैनात असून १ पथक राखीव आहे. या प्रत्येक पथकात दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षक, तर एक व्हिडिओग्राफर, अशा ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक मतदारांसाठी शनिवार, ९ आणि रविवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधितांच्या घरी जाईल आणि म तदान करून घेईल, असे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी सांगितले.