जळगाव : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्यात मतदान होणार आहे. त्याकरिता केंद्रीय संचार ब्यूरो विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यात 11 पासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत डिजिटल चित्ररथ मार्फत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या प्रागंणात मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी प्रवास करेल. मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजगृती करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. हा चित्ररथ मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधाची माहिती देण्यात येणार आहे.
याअनुषंगाने जिल्ह्यात डिजिटल चित्ररथद्वारे मतदार जनजगृती करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या डिजिटल चित्ररथाच्या शुभारंभ प्रसंगी दिशा संस्था यांच्यामार्फत विनोद ढगे व चमूने पथनाट्य सादर केले. श्री अंकित यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ देत उपक्रमास शुभेच्छा देऊन चित्ररथास हिरवा झेंडा दाखविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केंद्रीय संचार ब्यूरोचे नोडल ऑफिसर पंकज दाभाडे यांनी केले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तथा नोडल अधिकारी स्वीप योगेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भाऊसाहेब अकलाडे , कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सुनील पाटील तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.