Assembly Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गुन्हेगार हद्दपार

जळगाव : विविध गुन्ह्यांची पोलीस डायरीत नोंद असलेल्या शनिपेठेतील एक तसेच रामानंदनगरातील एक अशा शहरातील दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शनिपेठ हद्दीतील नमीरखान असिफखान (रा. काट्याफाईल जळगाव) तसेच रामानंदनगर हद्दीतील मनोज रमेश भालेराव (सिध्दार्थनगर, पिंप्राळा हुडको) अशी संशयितांची नावे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दोघांचे प्रस्ताव जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे सादर करण्यात आले होते. प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याकडे या प्रस्तावावर चौकशीचे कामकाज झाले. सुनावणीअंती दोघांना हद्दपारीचे आदेश केले.

नसीरखान असिफखान याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डववरील गुन्हेगार आहे. दंगा, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, शस्त्र बाळगणे अशा त्याच्या गुन्ह्यांची पोलीस डायरीत नोंद आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तनात न सुधार केल्याने त्याच्या विरोधात प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जुलै २०२४ रोजी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याकडे चौकशी कामकाज झाले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी त्याला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी
हद्दपारीचे आदेश दिले. मनोज भालेराव याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील आहे. दंगा, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, जबरी चोरी असे गुन्हे त्याच्यावर आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली होती. मात्र वर्तनात सुधार न केल्याने त्याच्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मनोज भालेराव यालाही ३१ ऑक्टोबरच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.

आरोपींना द्यावी लागणार हजेरी
हद्दपारीच्या काळात ज्या परिसरात वास्तव्य राहील तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात या आरोर्पीना महिन्यातून एक वेळा हजेरी द्यावी लागेल. जिल्ह्यात पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश करू नये, हद्दपारीच्या काळात ठिकाणाचा पत्ता बदल झाल्यास ती माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी लागेल. या सूचनांचे पालन करणे संशयितांना बंधनकारक असणार आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने २० नोव्हेंबर रोजी संशयितांना मतदान करण्यापुरती मुभा देण्यात आली आहे.