धक्कादायक कट उघड! पतीचा मृत्यू ‘रिपिट टेलिकास्ट’ करून ५० लाखांचा विमा उकळण्याचा प्रयत्न; पत्नी सहित ९ जणांना अटक….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात विमा फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपघाती विम्याच्या रकमेवर डोळा ठेवून एका व्यक्तीच्या मृत्यूची बनावट कहाणी तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता, त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष मृत्यू वर्षभर आधी आजाराने झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ दुचाकी अपघातात राजेंद्र जाधव यांचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. या कथित अपघाताच्या आधारे कागदपत्रे तयार करून विमा कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा दावा दाखल करण्यात आला होता. अपघातानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचेही कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले होते.

मात्र विमा कंपनीला या प्रकरणात संशय आल्याने त्यांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली. तपासादरम्यान अनेक विसंगती समोर आल्या. चौकशीमध्ये असे स्पष्ट झाले की, संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघातात नसून सुमारे वर्षभर आधी गंभीर आजारामुळे झाला होता. त्यानंतरही अपघाताची बनावट घटना तयार करून विमा रकमेचा दावा करण्यात आल्याचे उघड झाले.

या प्रकरणात मृत व्यक्तीच्या पत्नीवर मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या कटात काही नातेवाईक, वाहन चालक, विमा प्रतिनिधी, डॉक्टर आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीच्या नावावर अनेक विमा पॉलिसी असल्याचेही तपासात आढळून आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे विमा फसवणुकीच्या गंभीर प्रकरणांबाबत प्रशासन आणि विमा कंपन्यांमध्येही खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---