---Advertisement---
जळगाव: शहरालगतच्या खोटे नगर परिसरातील एका निर्जन स्थळी २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी दिलेल्या झुंजार लढ्यामुळे संतापलेल्या नराधमाने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेचा मोबाईल आणि तिची महत्त्वाची मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना १० एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हॉटेल आशीर्वाद जवळील परिसरात घडली. आरोपी भागवत गोविंद चव्हाण (रा. वाघ नगर, जळगाव) याने पीडित तरुणीला निर्जन स्थळी नेले. त्याठिकाणी आरोपीने अश्लील चाळे करत विनयभंग करण्यास सुरुवात केली. पीडितेने या कृत्याचा कडाडून विरोध केला असता, आरोपीने तिला जमिनीवर पाडून तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी मोठा संघर्ष केला. यामुळे आरोपी अधिकच हिंसक झाला. त्याने पीडितेच्या पोटावर, पाठीवर आणि डोळ्यावर गंभीर मारहाण केली. त्यानंतर पीडितेचा मोबाईल आणि तिची सर्व ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रे बळजबरीने हिसकावून आरोपी पसार झाला.
घटनेनंतर पीडितेने ३० एप्रिल २०२६ रोजी जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी भागवत चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११५(२), ३५१(२), ६२, ६४, ७४ आणि ७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.
शहरात घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.









