---Advertisement---
नागपूर | प्रतिनिधी
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते श्याम मानव यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान बागेश्वर बाबांनी श्याम मानव यांना थेट आव्हान देत, “प्रदेश तुमचा आणि मंचही तुमचा आहे, ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे,” असे जाहीर केले.
बाबांनी स्पष्ट केले की ते स्वतः कोणाकडे जाणार नाहीत, मात्र नागपूरमध्ये दोन दिवस दरबार भरवून तेथील कार्यक्रमातच आपली ‘सिद्धी’ दाखवतील. त्यांच्या या आव्हानानंतर श्याम मानव यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत बाबांना ‘ढोंगी’ ठरवले. “त्यांच्याकडे कोणतीही दैवी शक्ती नाही, ते फक्त लोकांची फसवणूक करतात,” असा आरोप त्यांनी केला.
श्याम मानव यांनी पुढे मोठे आव्हान देत म्हटले की, “बाबांनी शेजारच्या खोलीतील वस्तू, उपस्थित भक्तांची नावे, मोबाईल नंबर किंवा त्यांच्या घरातील माहिती अचूक सांगून दाखवावी. हे सिद्ध केल्यास त्यांना ८० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.” याचबरोबर, जर बाबांनी ९० टक्के गोष्टी अचूक सांगितल्या तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
दरम्यान, या वादाला जुना संदर्भही आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तपासानंतर पोलिसांनी व्हिडिओमध्ये कोणतेही आक्षेपार्ह किंवा कायद्याने गुन्हा ठरेल असे काही आढळले नसल्याचे स्पष्ट केले होते.
याच पार्श्वभूमीवर बागेश्वर बाबांच्या काही वक्तव्यांमुळेही वाद निर्माण झाला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी “चार मुलांपैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे,” असे वक्तव्य केले होते. या विधानावरूनही विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या या आव्हान-प्रतिआव्हानामुळे नागपूरसह राज्यभरात मोठी चर्चा रंगली असून, दोन्ही बाजूंमधील प्रत्यक्ष सामना कधी आणि कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









