---Advertisement---
शहरातील एअरपोर्ट परिसरातील ‘तारा बिझनेस पार्क’ भागात झालेली मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात जळगावच्या एमआयडीसी पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका सराईत आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तारा बिझनेस पार्क भागातील रहिवासी मोईज अब्बाज बोहरा हे गेल्या महिन्यात कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ते घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि घरातील मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मध्यप्रदेशच्या दुर्गम भागातून आरोपींना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास केला. तपासादरम्यान ही टोळी मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने चाचरीया पाटी, सेंधवा परिसरात वेषांतर करून सापळा रचला आणि ६ संशयित आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी या घरफोडीची कबुली दिली आहे.
अटक केलेले आरोपी:
१) निलेश उर्फ भुन्या माहेरिया डुडवे
२) ताराचंद पठाण सोलंकी
३) सायसिंग राकेश सोलंकी
४) रविंद्र छोटू आर्य
५) दिलीप मंगा डुडवे
६) ग्यारशीलाल मगन अलावे
(सर्व राहणार: चाचरीया पाटी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश)
हस्तगत केलेला मुद्देमाल:
सोन्याचे दागिने व सोन्याची लगड: ३१ ग्रॅम (किंमत ५,४७,५०० रुपये)
चांदीचे दागिने: ९१ ग्रॅम (किंमत २५,००० रुपये)
रोख रक्कम: ५,७८,००० रुपये (भारतीय चलनी नोटा)
एकूण किंमत: ११,५०,५०० रुपये.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली आहे.









