---Advertisement---
यंदा फेब्रुवारी महिना संपत नाही तोवर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा डोके वर काढतो आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी झपाट्याने वाढते आणि पुरवठा व्यवस्थेवर ताण येतो. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील नागरिकांसाठी पाणी पुरवठाबाबत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव शहरात सुरू असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. अनेक प्रभागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले. असून त्या मार्गे पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा झाली आहे.
सध्या अनेक भागांत दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र उन्हाळा जवळ आल्यामुळे नागरिकांनी हे अंतर कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ज्या प्रभागांमध्ये योजनेचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
महापौरांनी यासंदर्भात आयुक्तांना पत्र देत नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष वेधले होते. या पत्राची दखल घेत प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाला आवश्यक त्या तांत्रिक फेरनियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. अमृत योजनेचे काम पूर्ण झालेल्या भागांमध्ये लवकरात लवकर सुधारित वेळापत्रक लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उन्हाळ्याच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा झाल्यास शहरातील दैनंदिन जीवन सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता प्रशासनाच्या अंमलबजावणीवर सर्वांचे लक्ष लागले असून, प्रत्यक्षात एक दिवसाआड पाणीपुरवठा कधी सुरू होतो याकडे जळगावकरांचे डोळे लागले आहेत.









