जळगाव : येथील ऑफिसर्स क्लबमध्ये प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ५४ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात ऑफिसर्स क्लबचे अधिकारी व महिला सदस्य, समाजकल्याण विभागाचे कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्र, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीचे इंजिनिअरिंग कॉलेज, एनसीसी, एचडी फायर कंपनीचे अधिकारी तसेच रोटरी क्लब (मिड टाऊन) यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
भारत सरकार व भारतीय सशस्त्र सेना यांनी अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला अभूतपूर्व यश लाभले आहे. या पार्श्वभूमीवर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यासोबतच पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांना रक्तदान शिबीर आयोजनाचे आवाहन केले होते. या शिबिर यस्वीतेसाठी रेड क्रॉस संस्था, ऑफिसर्स क्लबचे सदस्य व डॉक्टर्स यांनी सहकार्य केले.
प्रथम रक्तदात्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
रेड क्रॉसतर्फे ज्या रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले, त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त तथा ऑफिसर्स क्लबचे सचिव योगेश पाटील यांनी दिली.