भुसावळ : येथे प्लंबर लायसन्सचे नूतनीकरनाणासाठी लाच स्विकारताना एका अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचप प्रतिबंध विभागाच्या जळगाव पथकाने अटक केली . या कारवाई अंतर्गत एसीबीच्या पथकाने पालिकेच्या फिल्टर हाऊसमध्ये सापळा रचून तिघांना रंगेहात ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत, पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख, लिपिक शांताराम उखर्डू सुरवाडे (वय 57), आणि कर्मचारी शाम समाधान साबळे (वय 28). 46 वर्षीय तक्रारदार हे प्लंबर असून, त्यांना दरवर्षी लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते. यासाठी त्यांनी पाणीपुरवठा विभागात संपर्क साधला असता, आरोपी शाम साबळे याने 700 रुपयांची लाच मागितली. यानंतर साबळेने अभियंता देशमुख यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सहाशे रुपये देण्यास सांगितले.
लाच स्वीकारताना रंगेहात पकड
तक्रारीनंतर जळगाव एसीबीने सापळा रचून सुरवाडे याला सहाशे रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्यानंतर लाच प्रकरणात संलिप्त असलेल्या अभियंता देशमुख व कर्मचारी साबळे यांनाही अटक करण्यात आली. आरोपी देशमुखच्या घराची झडती घेण्यात आली असता काहीही आढळले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रोख रक्कम आणि मोबाईल जप्त
या कारवाईत आरोपी शाम साबळे यांच्याकडून मोबाईल, अभियंता देशमुखकडून मोबाईल आणि 2,160 रुपये रोख, तसेच सुरवाडे यांच्याकडून एक हजार रुपये व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीपथकाची कौतुकास्पद कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधवझ`, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील चालक सहा. पो. उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटी, महिला हवालदार शैला धनगर, बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने व प्रदीप पोळ यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.