बोदवड : मी मित्रांना भेटून येतो असे सांगून घरातून निघालेल्या बस चालकाने रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना घटना शुक्रवारी (६ जून) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. कन्व्हरलाल एकनाथ अठ्ठकाळे (वय ४३, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) असे मयत बसचालकचे नाव आहे. बस चालकाने केलेल्या आत्महत्येने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बोदवड रेल्वे स्थानकाच्या उप लाइनवर कन्व्हरलाल अठ्ठकाळे यांनी रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आपले जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मुलाला आपण आत्महत्या करीत आहोत असे कळविले होते. कनव्हरलाल हा पुणे महानगरपालिकेत बसचालक म्हणून कार्यरत होता. मागील महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. त्यांचा मुलगा हा दहावीत आहे.
शुक्रवारी सकाळी तो पत्नीसोबत मुक्ताईनगरच्या रुग्णालयात जाऊन आला. यानंतर त्यांनी पत्नीला घरी सोडले. यावेळी तो ‘मी मित्रांना भेटून येतो’ असे सांगून घराबाहेर पडला. घरातून बाहेर पडताच त्याने थेट बोदवड रेल्वे स्थानक गाठले. तेथून मुलाला मोबाइलवरुन मॅसेज केला. या मेसेजमध्ये आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने कळविले. यानंतर त्याने रेल्वे समोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. या बसचालकाला फुप्फुसाचा कर्करोग असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. या आजाराला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
