---Advertisement---
अमळनेर तालुक्यातील गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत ५ ते ७ फूट उंचीची ओल्या व सुक्या स्वरूपातील गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यास अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील गडखांब शिवारात गट क्रमांक २३२४ मध्ये गांजाची अवैध लागवड करण्यात आली होती. तपासादरम्यान ही शेती सुरेश लोटन पाटील (रा. गडखांब) याची असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही दिवसांपूर्वी गांजाची विक्री झाल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, शरद काळे, नामदेव बोरकर तसेच पोलिस पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी सुमारे सहा वाजता ही धाड यशस्वी केली.
या कारवाईमुळे अमळनेर तालुक्यात अवैध अमली पदार्थांच्या लागवडीवर पोलिसांचा वचक स्पष्ट झाला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.









