---Advertisement---
अमळनेर : पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमळनेर न्यायालयाने सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी असिफ बागवान (रा. अमळनेर) हे केळी व्यापारी असून व्यावसायिक कामानिमित्त ते संभाजीनगर व अजिंठा परिसरात ये-जा करीत असत. याच दरम्यान त्यांची ओळख संबंधित आरोपींशी झाली. आरोपींनी जादूटोणा व पूजाविधीच्या माध्यमातून रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला फिर्यादी यांनी नकार दिला. मात्र आरोपींनी वारंवार संपर्क साधून विश्वास संपादन केला. १७ डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादी यांना जळगाव येथे बोलावून घरात विशेष पूजाविधी करून पैसे दुप्पट करून देण्याचे सांगितले. फिर्यादी यांनी पत्नीचे दागिने विकून ११ लाख रुपये आरोपींना दिले.
पूजेदरम्यान नोटांचे बंडल बदलून त्यात बनावट नोटा ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. संशय आल्याने फिर्यादी यांनी नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. संबंधित आरोपींकडून ५ लाख रुपयांची मुदतपत्रे व ६ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला; मात्र ती कागदपत्रेही बनावट असल्याचे समोर आले.
उपलब्ध पुरावे, कागदपत्रे व पोलिसांच्या जबाबांच्या आधारे अमळनेर न्यायालयाने सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.









