जळगाव : शहरातील मोबाईल मार्केटम्हणून प्रसिद्ध असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीतीला काही सदस्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक तर एक संशयित फरार आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी जवळपास ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले.
गुरुवारी (१२ मे) रोजी पहाटेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील ‘पूजा मोबाईल शॉपी’ या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला होता. दुकानात प्रवेश करण्यासाठी चोरटयांनी शटर तोडले होते. दुकानातून त्यांनी ५० हजार रुपये किंमतीचा मोबाईल व दुकानात असलेल्या साहित्य लांबवीले. याप्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांनी तत्काळ व जलद गतीने तपास करण्याच्या सूचना केल्या.

या तपासासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रामचंद्र शिखरे, सफौ सुनील पाटील, पोहेकॉं संतोष खवले, उमेश भांडारकर, सतीष पाटील, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुल पांचाळ व प्रणय पवार यांच्या विशेष पथकाने काम सुरू केले.
घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी समीर युसूफ शेख (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) व अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय २०, रा. उमर कॉलनी) या दोन संशयितांना अटक केली. त्यांच्या साथीदार अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) याचा पोलिस शोध घेत आहेत.
अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी अबरार खाटीक याच्यावर यापूर्वी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर पसार असलेला अनिल सोनवणे याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.