---Advertisement---
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर भुसावळ नगरपालिकेची पहिलीच सभा ही भुसावळ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेत काही विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच अनेक विषय ही मंजूर देखील करण्यात आले. पालिकेच्या या पहिल्याच सभेत प्रभाग क्रमांक दोन मधील पाणीपुरवठा योजनेची संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून मोठा वाद निर्माण झाला ज्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांकडून 250 विषयांना मंजुरी देण्यात आली, भुसावळ शहरातील पाणीटंचाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलाची दुरुस्ती तसंच ६० आरक्षित गाळ्यांचा प्रश्न, जामनेर रोडवरील दीनदयाल नगर येथील स्ट्रीट लाईट बंद असल्याची तक्रार या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच निर्णय देखील घेण्यात आले.
दरम्यान भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी मांडलेल्या विषयावर नगरसेवक सचिन पाटील यांनी आक्षेप घेतल्याने या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली व दोन्ही गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळालं यावेळी इतर नगरसेवकांनीही या वादात उडी घेतल्याने भुसावळ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोठा तणाव निर्माण झाला. आणि स्वीकृत नगरसेवक यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत करण्यात आला.
दरम्यान उर्वरित विषयांच्या मंजुरीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना एक पत्र सादर केले होते. या पत्रात उर्वरित विषयांना मंजुरी देणे किंवा नामंजूर करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे काही विषयांना मंजुरी मिळाली असली तरी अद्याप काही विषय हे प्रलंबित आहे. त्यामुळे त्या विषयांची मागणी करत असताना सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान भुसावळ नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो लावण्यासंदर्भात सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.









