---Advertisement---
नशिराबाद येथे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील याला दोन गावठी कट्ट्यांसह पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, २३ मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार नशिराबाद परिसरात सायंकाळी १६ ते २३ दरम्यान ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविण्यात येत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ शहर पोलीस स्टेशनमधील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. वरची अळी, नशिराबाद) हा बस स्टँड परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत आहे. सपोनि नारखेडे यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी सापळा रचूनरात्री २०.२० वाजता संशयित चेतन पाटील याच्यावर अचानक छापा टाकला. झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी चंदेरी रंगाचा गावठी कट्टा आणि एक डमी कट्टा मिळून आला. पोलिसांनी दोन्ही शस्त्रे जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगिता नारखेडे, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, भूषण पाटील आणि विजय अहिरे यांच्या पथकाने केली आहे.









